सध्या माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे व मला अडकवण्याचा डाव फडणवीसांचा असल्याचा आरोप देशमुख करत आहेत. मात्र अशातच आता राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. निलंबित पोलीस अधिकारी व १०० कोटी वसुलीच्या खंडणी प्रकरणातील आरोपी सचिन वाझे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी केलेल्या विधानांमध्ये त्यांनी जयंत पाटलांचे देखील नाव घेतले आहे.
वसुली प्रकरणात आरोपी असलेले सचिन वाझे याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख हे त्यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा आरोप वाझेने पत्रातून केले आहेत. या प्रकरणातील पुरावे देखील त्यांनी फडणवीसांना दिले आहेत. या पत्रात जयंत पाटलांचे नाव असल्याचे वाझे म्हणाले. जयंत पाटील यांचे नाव आल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.