Sagar Wall Collapse : मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात भिंत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 9 मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलांचे वय 10 ते 14 वर्षे आहे. ही मुले शाहपुरा येथील मंदिराजवळ नश्वर शिवलिंग बनवत असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी ही मुले पडलेल्या भिंतीच्या खाली आली.
सागरचे जिल्हाधिकारी दीपक आर्य सांगतात, “सकाळी 8.30 च्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात 9 मुलांचा मृत्यू झाला तर 2 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.”
या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करताना, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी त्यांच्या सोशल मीडिया वेबसाईट X वर पोस्ट शेअर करत मृत मुलांच्या कुटुंबीयांना सरकारकडून मदत दिली जाणार आहे. असे सांगितले.
पोस्टमध्ये त्यांनी म्हंटले आहे की, ‘सागर जिल्ह्यात घटना ऐकून दुःख झाले, मृत बालकांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. या दुर्घटनेत जखमी झालेल्या इतर मुलांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी अशी माझी इच्छा आहे. ज्या कुटुंबांनी निष्पाप मुले गमावली आहेत त्यांच्याबद्दल माझ्या मनापासून संवेदना. मृत मुलांच्या कुटुंबीयांना सरकारकडून प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.’ तसेच जखमी मुलांवर योग्य उपचार करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.