Paris Olympics 2024 (Hockey) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये रविवारी भारत आणि ग्रेट ब्रिटन यांच्यात रोमांचक सामना पाहायला मिळाला. पुरुष हॉकीच्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत ब्रिटनचा पराभव करत भारताने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारताने सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पूर्णवेळपर्यंत सामना १-१ असा बरोबरीत राहिला, त्यानंतर निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये आला. अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेश पुन्हा एकदा भिंत ठरला. भारताने शूटआऊट 4-2 ने सामना जिंकला.
भारत 10 खेळाडूंसह मैदानात उतरला
पहिल्या क्वार्टरमध्ये एकही गोल झाला नाही. मात्र, 17व्या मिनिटाला अमित रोहितदासला रेड कार्ड दिल्याने भारताला मोठा धक्का बसला. त्याला मैदान सोडावे लागले आणि भारताला उर्वरित सामना 10 खेळाडूंसह खेळावा लागला. या सामन्यात कर्णधार हरमनप्रीतने भारताचे खाते उघडले. त्याने 22व्या मिनिटाला गोल केला. पॅरिस ऑलिम्पिकमधील हरमनप्रीतचा हा सातवा गोल होता. मात्र, काही वेळातच ब्रिजेटने बरोबरी साधली. 27व्या मिनिटाला ली मॉर्टनने गोल केला आणि कार्टरने दुसरा गोल पूर्ण करेपर्यंत स्कोअर 1-1 असा राहिला. तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये कोणत्याही संघाला गोल करता आला नाही.
भारतीय संघाने केली इतिहासाची पुनरावृत्ती
भारताच्या पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकच्या इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. 2021 मध्ये, भारताने टोकियो येथे उपांत्यपूर्व फेरीत ब्रिटनचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर भारताने ब्रिटनचा ३-१ असा पराभव केला होता पण उपांत्य फेरीत बेल्जियमकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, कांस्यपदकाच्या लढतीत जर्मनीला हरवून भारतीय संघाने ४१ वर्षांचा दुष्काळ संपवला. भारत आता पॅरिसमध्ये आपल्या पदकाचा रंग बदलण्याचा प्रयत्न करणार आहे.