Bangladesh clashes : बांगलादेशातून पुन्हा एकदा हिंसाचाराची बातमी समोर आली आहे. बांगलादेशात रविवारी उसळलेल्या हिंसाचारात 32 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि शेकडो लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या आंदोलनात विद्यार्थी आंदोलक, पोलिस आणि सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याची माहिती आहे.
पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या हजारो आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला आणि स्टन ग्रेनेडचा वापर केला. अशातच आता सरकारने रविवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून अनिश्चित काळासाठी देशव्यापी कर्फ्यू जाहीर केला आहे.
सरकारी नोकऱ्यांसाठी असलेली कोटा पद्धत रद्द करण्याच्या मागणीसाठी बांगलादेशातील विद्यार्थी एका महिन्याहून अधिक काळ आंदोलन करत आहेत. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात यापूर्वीही हिंसाचार उसळला असून देशभरात आतापर्यंत किमान २०० जणांचा मृत्यू झाला आहे. राजधानी ढाका हे आंदोलनाचे केंद्र बनले आहे.
रविवारी आंदोलकांचा जमाव काठ्या घेऊन आले होते. ढाक्याच्या मध्यभागी शाहबाग चौकात हा जमाव जमला तेव्हा पोलिस आणि आंदोलकांमध्ये जोरदार संघर्ष झाला. याशिवाय अनेक ठिकाणी आणि प्रमुख शहरांमध्ये रस्त्यावर आंदोलक आणि पोलिस कर्मचारी यांच्यात बाचाबाची झाली. आंदोलकांनी प्रमुख महामार्ग रोखून धरले.
आंदोलकांमध्ये विद्यार्थी तसेच प्रमुख विरोधी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने पाठिंबा दिलेल्या काही गटांचा समावेश आहे. आंदोलकांनी कर आणि बिले न भरण्याचे आवाहन केले असून रविवारी कामावर न जाण्याचे आवाहनही केले आहे. आंदोलकांनी रविवारी ढाक्याच्या शाहबाग भागातील बंगबंधू शेख मुजीब मेडिकल युनिव्हर्सिटी या रुग्णालयासह खुल्या कार्यालयांवर आणि आस्थापनांवरही हल्ले केले. अशा स्थितीत संपूर्ण शहर युद्धभूमीत बदलले असल्याची माहिती मिळत आहे.