Chitra Wagh : सत्तेत असताना वाझेंची सुटका करू,असे आमिष दाखवून त्याचे स्टेटमेंट घेतले होते का..? आता सचिन वाझे नार्को टेस्टला तयार आहे,तर अनिलबाबू तुम्हीही नार्को टेस्टला तयार रहा आणि एकदा १०० कोटींच्या वसुलीचे वास्तव महाराष्ट्राला कळूनच जाऊ द्या असं म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना चांगलेचं सुनावले आहे. नुकताच त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडल ‘एक्स’ अकाऊंटवर विडिओ पोस्ट करून या प्रकरणावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
निलंबित पोलीस अधिकारी आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण तसंच अँटेलिया प्रकरणातला आरोपी सचिन वाझेने आरोप केला आहे की अनिल देशमुख त्यांच्या पीएमार्फत पैसे घेत होते. शनिवारी सकाळी हा आरोप करुन सचिन वाझेने खळबळ उडवून दिली. तसंच मी या संदर्भात देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे असंही सचिन वाझेने म्हटलं आहे. त्यावर अनिल देशमुख यांनी माध्यमांसमोर येत पुन्हा एकदा सचिन वाझे हा देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन बोलतो आहे असं म्हटलं आहे. तसंच चांदिवाल समितीचा अहवाल सादर करा आणि नार्को टेस्ट करून लोकांना कळू द्या खरं – खोटं.अशी मागणी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
सध्या राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख यांच्यात चांगलेच वाकयुद्ध रंगले आहे.या प्रकरणावर चित्रा वाघ यांनी अनिल देशमुख यांना धारेवर धरून काही प्रश्न विचारले आहेत.