Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर असणार आहेत. पुण्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा रद्द केला असून पुण्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करणार आहेत.
तसेच नुकसान झालेल्या भागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा दिल्ली दौरा रद्द केला आहे.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती होती. मात्र दिल्ली दौरा रद्द करत ते पुण्यातील पुरपरिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्ता एकतानगर आणि काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. या ठिकाणी शिंदे आज भेट देणार आहेत.
राज्यात गेल्या आठवडाभरापासून पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. पुण्यात देखील गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. सलग सुरु असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणातून नदीपत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे, खडकवासला धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे अनेक भागात पूर परिस्थितीत निर्माण झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दौरा
यापूर्वी 25 जुलै रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील एकता नगर आणि विठ्ठल नगर या पूरग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता.
पाच राज्यांमध्ये अतिवृष्टीचा रेड अलर्ट
हवामान खात्याने मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर येत्या काही दिवसांत केरळ, किनारी कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.