MNS Assembly Election 2024 : आगामी विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपली रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपावरुन रस्सीखेच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे मनसेने विधानसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवार जाहीर केले. याबाबत मनसेने पत्रक प्रसिद्ध केलं आहे. राज ठाकरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते शिरीष सावंत यांनी याबाबत पत्रक जारी करत सांगितलं की, ‘राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा सुरु आहे. आज (5 ऑगस्ट) सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे राजसाहेब ठाकरे यांनी मनसेच्या दोन विधानसभा उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवडी विधानसभा मतदारसंघातून बाळा नांदगांवकर आणि पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात येत आहे.
225 ते 250 जागा लढवणार
1 ऑगस्टपासून पासून राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा सुरु झाला आहे. विधानसभा निवडणुकीत मनसे स्वबळावर लढणार असल्याचा पुनरुच्चारही राज ठाकरे यांनी केला. विधानसभेच्या 225 ते 250 जागा लढवणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.
लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी पीएम मोदी आणि महायुतीला पाठिंबा दिला होता. ते महायुतीच्या अनेक सभांमध्ये दिसले. त्यांनी प्रचार देखील केला होता. आता लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे स्वबळावर लढणार असल्यामुळे महायुतीलायाचा फटका बसू शकतो.