Article 370 : जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातून कलम ३७० हटवून आज पाच वर्षे पूर्ण झाले आहेत. कलम 370 रद्द करून पाच वर्षे पूर्ण झाल्यामुळे सोमवारी जम्मूच्या अखनूर भागात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी अखनूर एलओसी परिसरात ठिकठिकाणी चौक्या उभारल्या असून जागोजागी सैनिक तैनात करण्यात आले आहे. याशिवाय जम्मू-काश्मीर पोलीस तसंच इतर सुरक्षा यंत्रणाही सतर्क आहेत. सुरक्षा दलांकडून वाहने आणि कागदपत्रांचीही कसून तपासणी केली जात आहे.
या दिवशी 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 हटवण्यात आले होते, ज्यामुळे जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा आणि राज्याचा दर्जाही रद्द करण्यात आला होता. कलम 370 हटवल्याच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून कोणत्याही प्रकारची घुसखोरी किंवा अन्य घटना रोखण्यासाठी शहरापासून गावापर्यंत कडक पाळत ठेवली जात आहे.
दक्षिण जम्मूचे पोलिस अधीक्षक अजय शर्मा म्हणाले, ‘दहशतवादी कारवाया पाहता आम्ही नेहमीच सतर्क असतो. 5 ऑगस्ट असो वा 15 ऑगस्ट. आम्ही आमच्या सुरक्षा सज्जतेबद्दल सर्व काही सांगू शकत नाही. परंतु, आम्ही सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की, सुरक्षेच्या बाबतीत आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही, अलिकडच्या काही महिन्यांत जम्मू भागात दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. ज्यामध्ये कठुआमध्ये लष्कराच्या ताफ्यावर झालेला हल्ला आणि डोडा आणि उधमपूरमधील चकमकीच्या घटनांचा समावेश आहे.
गेल्या महिन्यात जुलै महिन्यात केंद्रीय गृह मंत्रालयाने लोकसभेत माहिती देताना सांगितले होते की, यावर्षी 21 जुलैपर्यंत दहशतवादाशी संबंधित 11 घटनांमध्ये नागरिक आणि सुरक्षा जवानांसह एकूण 28 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्यात, जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील माछल सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानच्या बॉर्डर ॲक्शन टीमने केलेला हल्ला भारतीय लष्कराच्या जवानांनी हाणून पाडला होता, ज्यामध्ये एक पाकिस्तानी घुसखोर मारला गेला होता. या हल्ल्यात भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला, तर मेजर रँकच्या अधिकाऱ्यासह चार जण जखमी झाले.