Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीबाबत (एनडीए) मोठा दावा केला आहे. यावेळी ते म्हणाले की, ही आघाडी केवळ आपला कार्यकाळ पूर्ण करणार नाही तर 2029 मध्ये पुन्हा सरकार स्थापन करेल.
चंदीगडमधील मनीमाजरा येथे 24 तास पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी शाह यांनी प्रकल्पाचे उद्घाटन केले. यानंतर जाहीर सभेला संबोधित करताना ते म्हणाले, ‘विरोधकांना जे बोलायचे आहे ते बोलूद्या…आम्ही 2029 मध्येही सत्तेत येऊ…यानंतरही एनडीएचे सरकार स्थापन होईल आणि पंतप्रधान होतील, याची मी खात्री देतो. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी अमित शहा म्हणाले, ‘विरोधकांना वाटते की, त्यांनी काही प्रमाणात यश मिळवून निवडणुका जिंकल्या आहेत. गेल्या तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसला जितक्या जागा मिळाल्या आहेत, त्यापेक्षा जास्त जागा या निवडणुकीत भाजपला मिळाल्या आहेत, हे त्यांना माहीत नाही. एनडीएचा एकमेव घटक असलेल्या भाजपकडे त्यांच्या संपूर्ण आघाडीपेक्षा जास्त जागा आहेत.
‘सरकार 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल’
पुढे ते म्हणाले, ‘मी विरोधी पक्षांच्या मित्रांना आश्वासन देऊ इच्छितो की हे सरकार केवळ 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही तर पुढील कार्यकाळ देखील या सरकारचा असेल. विरोधी पक्षात बसण्याची तयारी ठेवा आणि विरोधी पक्षात प्रभावीपणे काम करायला शिका, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.
मणिमाजरा पाणीपुरवठा उद्घाटन
अमित शाह चंदीगडमधील मणिमाजरा येथे 24 तास पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी काल या प्रकल्पाचे उद्घाटन केले. पंजाबचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडचे प्रशासक गुलाब चंद कटारिया यावेळी उपस्थित होते. एकूण 75 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाचा मणिमाजरा येथील 1 लाखाहून अधिक रहिवाशांना फायदा होणार आहे.