शासनाचा निधी हा परप्रांतीय नागरिकांवर खर्च होत आहे असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. त्यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशा लोकांवर टाडा लागला पाहिजे. त्यांना कारागृहात टाकून मोकळे व्हायला पाहिजे. असे ते अमरावतीत माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.
यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाराष्ट्रातला माणूस यूपीमध्ये आहे. ओडिशामध्ये आहे. महाराष्ट्रातील माणूस पश्चिम बंगालमध्ये आहे. मध्यप्रदेशात आहे. गुजरातमध्ये सुद्धा आहे त्यांचं काय करायचे ? समाज दुभंगण्याची ही वक्तव्य आहेत, समाज दुभंगला की देश दुभंगतो. युएपीए आणि नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट यांच्यावर लागला पाहिजे. असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
मात्र आंबेडकरांच्या या वक्तव्यानंतर आता मनसे कार्यकर्ते आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना ‘सुपारीबाज’ असे म्हंटले होते. त्यानंतर अकोला येथे मनसेच्या काही कार्यकर्त्यांकडून त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. यामुळे वातावरण चांगलेच तापले होते.
राज ठाकरे नेमके काय म्हणाले ?
आपल्या महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की, आरक्षणाची गरजच नाही. पैशांचं व्यवस्थित नियोजन केले पाहिजे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या भागात ज्या प्रकारचे फ्लायओव्हर्स होत आहेत हे का होत आहेत? हे सगळे बाहेरून येणाऱ्यांसाठी होत आहेत. आपल्या ठाणे जिल्ह्यात देशामधला असा एकमेव जिल्हा आहे ज्यात सात ते आठ महानगरपालिका आहेत. एका जिल्ह्यात सात ते आठ महानगर पालिका असतील तर ही लोकसंख्या ठाण्यातील लोकांनी वाढवली का? बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंढा मोठ्या प्रमाणात आहे, मग त्या शहरांत आल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यासाठी सरकारचा पैसा खर्च होतो, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते.