Bangladesh Violence : बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एवढेच नाही तर त्या राजधानी ढाका सोडत सुरक्षित ठकाणी रवाना झाल्या आहेत. माहितीनुसार त्या भारतात येणार असल्याची बातमी आहे. हसीना यांनी बहीण शेख रेहानासह देश सोडला आहे.
सोशल मीडियावर शेख हसीना ढाक्यातून बाहेर पडतानाचे काही फोटो समोर आले आहेत. तसेच काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत. व्हिडिओमध्ये त्या हेलिकॉप्टरमधून बाहेर पडताना दिसत आहेत. दुसरीकडे, आणखी एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये अनेक आंदोलक ढाका येथील पंतप्रधानांच्या निवासस्थानात घुसले आणि हसीना देश सोडून गेल्यावर जल्लोष करताना दिसले.
बांगलादेशच्या लष्करप्रमुखांची नेत्यांसोबत बैठक!
बांगलादेशी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान लष्कराच्या मुख्यालयात विविध राजकीय पक्षांचे नेते आणि नागरी समाजाच्या सदस्यांची बैठक घेत आहेत.
या बैठकीला राष्ट्रीय पक्षाचे सह-अध्यक्ष अनिसुल इस्लाम महमूद आणि पक्षाचे सरचिटणीस मुजीबुल हक चुन्नू यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. ढाका विद्यापीठाच्या कायदा विभागाचे प्राध्यापक आसिफ नजरुल यांनाही लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान यांच्यासोबतच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले आहे.
लष्करप्रमुख दुपारी ३ वाजता देशाला संबोधित करणार असल्याची बातमी यापूर्वी आली होती. रिपोर्टनुसार, यासोबतच देशात अंतरिम लष्करी सरकार स्थापन करण्याची घोषणाही केली जाऊ शकते.
आतापर्यंत 300 हून अधिक लोकांचा मृत्यू
बांगलादेशात पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात आतापर्यंत 300 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. तर शेकडो जण जखमी झाले आहेत. हे आंदोलन सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या मुद्द्यावरून भडकले.