पुणे शहरात झिका व्हायरसचे (Zika Virus) रुग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत,आतापर्यंत शहरातील झिकाचा संसर्ग झालेल्या चार रुग्णांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.पुणे जिल्ह्यात झिकाचा प्रादुर्भाव वाढत असून आत्तापर्यंत ७२ जणांना झिकाची लागण झाले आहे. पुणे शहरातील रूग्णंसख्या ६५ वर गेली असताना काल पुण्यात आणखी सात जणांना झिकाची लागण झाली आहे. या रूग्णांमध्ये पाच गर्भवती महिलांचा समावेश आहे. तर, कात्रज कोंढवा परिसरातील १८ वर्षीय युवक आणि ४० वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. यामध्ये पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणचा समावेश आहे. गर्भवतील महिलांच्या बाळांचे स्कॅन नॉर्मल आलेले आहेत, अशी माहिती पुणे जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.मात्र गरोदर महिलांमध्ये असलेल्या झिका विषाणूमुळे होणाऱ्या बाळांमध्ये जन्मजात मायक्रोसेफली, गिलेन-बॅरे सिंड्रोम आणि इतर न्यूरोलॉजिकल गुंतागुंत होऊ शकते, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि ससून रुग्णालयातुन आणखी तपासणीचे अहवाल येणे बाकी असल्याने रुग्णांची संख्या वाढणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुणेकरांनी काळजी घ्यावी असे आवाहन पुणे महानगर पालिकेकडून केले जात आहे. पुणे महानगर पालिकेकडून झिकाला उपाययोजना देखील केल्या जात आहेत.
शिवणे व आंबेगाव बुद्रुक या ठिकाणी झिका व्हायरसचे नवे तीन रुग्ण आढळले आहेत. झिकाचे रूग्ण आणखी वाढू नयेत यासाठी खडकवासला, सांगरुण व खेड शिवापूर या तीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने घरोघरी रुग्ण शोध मोहीम सुरू केली आहे. झिकाची लागण झालेल्या रुग्णांच्या कुटुंबातील आणि संपर्कातील व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे, झिकाचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हा परिषदेचे आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे.
डेंग्यू आणि चिकनगुनियासारख्या संसर्गाचा प्रसार करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या संक्रमित एडिस डासाच्या चाव्याद्वारे झिका विषाणूचा प्रसार होतो. झिकाची लागण झालेले बहुतेक लोक एकतर लक्षणे नसलेले (८०% पर्यंत) राहतात किंवा ताप, पुरळ अंगदुखी आणि सांधेदुखीची अशी रुग्णांमध्ये लक्षणे बघायला मिळतात.