राज ठाकरे हे सुपारीबाज नेते असल्याची टीका अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. याशिवाय ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही राज ठाकरेंना लक्ष्य करत त्यांचे राजकारण हे मॅच फिक्सिंगचे असते असा टोला लगावला होता. दरम्यान, या टीकेवर आता राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे.
राज ठाकरे हे सोलापूर दौऱ्यावर असून त्यांनी आज येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना अमोल मिटकरी आणि संजय राऊत यांच्या टीकेबाबतही विचारण्यात आलं. यावर बोलताना, त्यांना योग्य वेळी योग्य उत्तर मिळेल, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.
मी अजून बोलायला सुरुवात केलेली नाही. ज्यावेळी मी बोलायला सुरुवात करेन, तेव्हा कोण काय बोलतं, हे कळेल. मी शांत आहे, याचं कारण मला आत्ता यांना उत्तरे द्यायची नाहीत. त्यांना योग्य वेळी योग्य उत्तर मिळेल, असे राज ठाकरे म्हणाले. तसेच, मी जेव्हा बोलेन तेव्हा काही गोष्टी कायमस्वरुपी त्यांच्यात लक्षात राहतील, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी आमदार अमोल मिटकरी आणि खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. राज ठाकरे यांनी दौऱ्यावर असताना अजित पवार यांना टोला लगावला होता. यावरून राज ठाकरे हे सुपारीबाज नेते असल्याचे अमोल मिटकरी म्हणाले होते. “दिलेला शब्द पाळणाऱ्या अजित पवारांबाबत सुपारी बहाद्दरांनी बोलू नये. कारण हे सुपारी बहाद्दर, टोल नाका असेल किंवा भोंग्यांचे आंदोलन असेल, असं कोणतेही आंदोलन यशस्वी करू शकलेले नाही. त्यांची विश्वासार्हता आता संपली आहे, असे ते म्हणाले होते.