बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेली निदर्शने आता नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र समोर आले आहे. देशभरात हिंसाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. देशातील बिकट परिस्थिती पाहता शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असून त्या बांगलादेश सोडून भारतात दाखल झाल्या आहेत.त्यादरम्यान विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली जमाते इस्लामी आणि बाकीच्या पाकिस्तान धार्जिण्या संघटनांचे दहशतवादी पंतप्रधान यांच्या निवासस्थानात घुसून लुटमार करताना दिसून आले आहेत. स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार आंदोलकांनी ढाक्यातील धनमंडी येथील शेख हसीना यांचे निवासस्थान सुधा सदनलाही आग लावली.पंतप्रधान यांच्या या निवासस्थानातून या लुटारूंनी तिथले फर्निचर, किचनमधले सामान लुटले. तसेच आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानातील सामान घेऊन जातानाचे व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत.
तसेच देशाच्या सरन्यायाधीशांच्या निवासस्थानाचीही तोडफोड केल्याचे वृत्त या वृत्तपत्राने जाहीर केले आहे. 19 हेअर रोडवर असलेल्या सरन्यायाधीशांच्या निवासस्थानी भिंतीवर चढून अनेक लोक प्रवेश करताना दिसून आले.
काही हिंसक आंदोलकांनी बांगलादेशातल्या रस्त्यांवरच्या वंगबंधू शेख मुजिबूर रहमान यांच्या पुतळ्यावर चढून त्याची विटंबना केली.बंगबंधू म्हणून ओळखले जाणारे शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबुर रहमान यांच्या पुतळ्याची तोडफोड करणाऱ्या आंदोलकांची दृश्येही स्थानिक माध्यमांनी दाखवली आहेत ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याचे नेतृत्व केले होते.त्यांच्या पुतळ्याची विटंबना करत हातोड्याने त्यांचा पुतळा फोडल्याचा फोटो देखील समोर आले आहेत. बांगलादेशच्या राजकारणात शेख मुजीबूर रहमान यांचा दर्जा भारतातील महात्मा गांधींसारखाच आहे. यादरम्यान निदर्शकांनी 32 धामंडी येथील बंगबंधू शेख मुजीबुर रहमान मेमोरियल म्युझियमलाही आग लावली. त्यात प्रचंड आग लागल्याचे आणि सरकारविरोधी निदर्शकांनी नारेबाजी केल्याचे वृत्त समोर आले आहे. आंदोलकांनी शेख हसीना या अवामी लीगच्या ढाका जिल्हा कार्यालयालाही आग लावली.