Maratha Reservation : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. दरम्यान, आता एक मोठी बातमी समोर येत आहे. मराठा मोर्चा आज थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी धडकणार आहे. आंदोलक रमेश केरे पाटील आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानापासून ते शरद पवार यांच्या निवासस्थानापर्यंत आंदोलन करणार आहेत. त्यामुळे दोन्ही बंगल्याबाहेर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आणि सुरक्षिततेमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समजाला आरक्षण मिळावे म्हणून मोठे आंदोलन उभारले. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजासाठी सरकारने स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली, मात्र, आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावे या मागणीवर अद्यापही मनोज जरांगे पाटील ठाम आहेत, तर दुसरीकडे ओबीसी समाजाकडून मनोज जरांगे पाटील यांच्या या मागणीला मोठा विरोध होत आहे.
आता मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा नवी डेडलाईन दिली आहे. 29 ऑगस्टला आम्ही भूमिका स्पष्ट करू असे जरांगे पाटील यांनी म्हंटले आहे. यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी १३ ऑगस्टपर्यंत सरकारला मुदत दिली होती.
यापूर्वी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर मोर्चा काढण्यात आला होता. उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी असे या आंदोलकांचे म्हणणे होते. त्यानंतर आता मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या रडारवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जेष्ठ नेते राज्यसभा खासदार शरद पवार हे दोन नेते आहेत.