Bangladesh Crisis : बांगलादेशातील आंदोलनाने आता हिंसक वळण घेतले आहे. बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेली निदर्शने आता नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र समोर आले आहे. देशभरात हिंसाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. देशातील बिकट परिस्थिती पाहता शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असून त्यांनी बांगलादेश सोडला आहे, आणि भारतात दाखल झाल्या आहेत. दरम्यान बांग्लादेशच्या हिंसाचाराच्या आणि घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली.
बांगलादेशातल्या परिस्थितीबाबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित होते.
यावेळी सरकारने बांगलादेशातील भारतीयांबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच बांगलादेशातील चालू घडामोडी आणि शेजारील देशातील सध्याच्या परिस्थितीबद्दल नेत्यांना माहिती दिली.
बैठकीदरम्यान जयशंकर यांनी आम्ही बांगलादेश लष्कराच्याही संपर्कात आहोत असे सांगितले. तसेच सरकार योग्य वेळी योग्य ती कारवाई करेल. असेही त्यांनी सांगितले.
बांगलादेशात सध्या 20 हजार भारतीय नागरिक असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. आतापर्यंत 8000 भारतीय नागरिक परत आले आहेत. भारत सरकार बांगलादेशातील भारतीय नागरिकांच्या संपर्कात आहेत, तसेच ते येथील परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहेत. अशी माहितीही जयशंकर यांनी बैठकीत दिली.