ED Raid on Congress MLA : मंगळवारी 6 ऑगस्ट रोजी सकाळी ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस आमदार रघुबीर बाली यांच्या घरावर छापा टाकला. यापूर्वीही ईडीने काँग्रेस आमदाराच्या घरावर छापा होता. गेल्या आठवड्यातही बुधवारी ईडीच्या पथकाने रघुबीर बाली यांचे दार ठोठावले होते.
बुधवारी कथित आयुष्मान भारत योजनेच्या फसवणुकीशी संबंधित मनी लाँड्रिंग चौकशीचा भाग म्हणून ईडीने काँग्रेस आमदार, काही खाजगी रुग्णालये आणि त्यांच्या प्रवर्तकांच्या जागेवर छापे टाकले होते, अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी शिमला, कांगडा, उना, मंडी आणि कुल्लू जिल्ह्यांव्यतिरिक्त दिल्ली, चंदीगड आणि पंजाबमध्ये 19 ठिकाणी छापे टाकण्यात आले.
आज झालेल्या तपास यंत्रणेच्या कारवाईबाबत काँग्रेस आमदार बाली यांनी सांगितले, त्यांच्या घरात असलेल्या प्रत्येक गोष्टीचा लेखाजोखा ठेवण्यात आला आहे आणि ते आपल्या पाळीव प्राण्यांसाठी चेकद्वारे अन्न मागवतात असे ते म्हणाले.
रघुबीर बाली यांच्या कंपनीवरही ईडीचा छापा
बाली यांच्या कंपनी हिमाचल हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडने प्रमोट केलेल्या कांगडा येथील फोर्टिस हॉस्पिटलमधेही ईडीने छापा
टाकला. कांगडा येथील बालाजी हॉस्पिटल आणि त्याचे प्रवर्तक राजेश शर्मा यांच्या परिसरावरही छापे टाकण्यात आले.
काँग्रेस आमदारावर छापेमारीचं कारण काय?
हे प्रकरण आयुष्मान भारत योजनेशी संबंधित घोटाळ्याचे आहे. या प्रकरणी उना जिल्ह्यात राज्य दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने किरण सोनी, उनास्थित श्री बांके बिहारी हॉस्पिटल आणि इतरांविरुद्ध बनावट आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्ड बनवल्याबद्दल एफआयआर नोंदवला होता, मात्र नंतर हे प्रकरण ईडीने ताब्यात घेतले. अशा बनावट कार्डांवर अनेक वैद्यकीय बिले तयार करून सरकारी तिजोरीचे आणि जनतेचे नुकसान होत असल्याचा आरोप ईडीने केला आहे. या प्रकरणी रघुबीर बाली यांच्या घराचीही झडती घेतली जात आहे.