Vinesh Phogat at Paris 2024 : स्टार भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिकच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये चमकदार कामगिरी केली. तिने 50 किलो वजनी गटात सध्याची ऑलिम्पिक चॅम्पियन आणि चार वेळा विश्वविजेती युई सुसाकीचा 3-2 असा पराभव केला. या सामन्यात ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती युई सुसाकी सुरुवातीला आघाडीवर होती, मात्र शेवटच्या १५ सेकंदात विनेशने गेम फिरवला. या विजयासह विनेशने आता उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.
माहितीसाठी याआधी सुसाकीला तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकाही पराभवाचा सामना करावा लागला नाही, अशातच असे मानले जात होते की विनेशला पहिली फेरी पार करणे देखील कठीण होईल, मात्र, शेवटच्या १५ सेकंदात विनेशने गेम आपल्या बाजूने करत सर्वांना चकित केले.
विनेश तिचे तिसरे ऑलिम्पिक खेळत आहे पण 50 किलोमध्ये ती प्रथमच खेळतआहे. यापूर्वी ती ५३ किलोमध्ये खेळायची. विनेशने महिलांच्या 50 किलो राऊंड ऑफ 16 मध्ये विजय मिळवला आहे, आता ती सुपर-8 आणि सेमीफायनल देखील खेळणार आहे.
विनेश फोगाटची आतापर्यंतची कामगिरी
जागतिक चॅम्पियनशिप कांस्यपदक विजेती आणि राष्ट्रकुल खेळ, आशियाई खेळ आणि आशियाई चॅम्पियनशिप सुवर्णपदक विजेती, विनेश इतिहासातील सर्वात यशस्वी भारतीय कुस्तीपटूंपैकी एक आहे, परंतु ऑलिम्पिक खेळांमधील तिची कामगिरी निराशाजनक आहे.
विनेश, प्रसिद्ध फोगाट बहिणींपैकी एक, तिने रिओ 2016 मध्ये महिलांच्या 48 किलो फ्रीस्टाइल गटात ऑलिम्पिक पदार्पण केले, परंतु गुडघ्याच्या गंभीर दुखापतीमुळे तिला उपांत्यपूर्व सामन्यातून माघार घ्यावी लागली. टोकियो 2020 मध्ये महिलांच्या 53 किलो गटातील उपांत्यपूर्व फेरीत जिंकण्याची प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या विनेशला पुन्हा एकदा उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.