बांगलादेशमध्ये सत्तापालट झाला आहे. दरम्यान नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस हे बांगलादेशचे प्रमुख झाले आहेत. लष्कराच्या नेतृत्वात हे सरकार स्थापन करण्यात आले आहे. मात्र बांग्लादेशमध्ये निर्माण झालेल्या हिंसाचारानंतर भारतीय सीमेवर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. तर अनेक भारतीय मायदेशी परतत आहेत. टाटाच्या नेतृत्वाखालील एअर इंडिया एअरलाइनने बुधवारी सकाळी नवी दिल्ली ते बांगलादेशची राजधानी ढाका येथे विशेष उड्डाण चालवले. ज्यामध्ये सहा मुलांसह 205 लोकांना भारतात आणण्यात आले आहे.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, A321 निओ विमानाने चालवलेले एअर इंडियाचे चार्टर्ड फ्लाइट मंगळवारी रात्री उशिरा ढाका येथून निघाले, ज्यामध्ये सहा मुले आणि 199 प्रौढांसह 205 जणांना भारतात आणले. ढाका विमानतळावरील पायाभूत सुविधांच्या आव्हानांना न जुमानता एअर इंडियाने हे विशेष विमान चालवले आहे. नवी दिल्लीहून ढाक्याला जाणाऱ्या एअर इंडियाच्या या विमानात प्रवासी नव्हते.
एअर इंडियाने रात्री उशिरा जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की एअरलाइन बुधवारपासून नवी दिल्ली आणि ढाका दरम्यानच्या दोन दैनंदिन उड्डाणे पुन्हा सुरू करेल. याच्या एक दिवस आधी, कंपनीने बांगलादेशची राजधानी ढाका येथे सकाळची फ्लाइट रद्द केली होती, परंतु संध्याकाळचे फ्लाइट नियोजित वेळेनुसार सोडले होते. विस्तारा आणि इंडिगो एअरलाइन्स देखील आजपासून नियोजित वेळापत्रकानुसार ढाक्यासाठी उड्डाणे चालवतील.
उल्लेखनीय आहे की शेख हसिना यांनी पंतप्रधानपदाचा अचानक राजीनामा दिल्याने आणि बांगलादेशातील वादग्रस्त आरक्षण व्यवस्थेच्या विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांच्या दरम्यान देश सोडल्यामुळे, एअरलाइन कंपन्यांनी मंगळवारी त्यांची ढाका येथे जाणारी सर्व उड्डाणे रद्द केली होती.