पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो महिला कुस्तीच्या अंतिम फेरीतून विनेश फोगटला अपात्र ठरवण्यात आल्यामुळे भारताला मोठा धक्का बसला आहे.यांनतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विनेश फोगाट हिचे सांत्वन केले आहे.
आपल्या एक्सवरील पोस्ट मध्ये पंतप्रधानांनी विनेशला चॅम्पियन्समध्ये चॅम्पियन असे संबोधले आहे “विनेश, तू चॅम्पियन्समधली एक श्रेष्ठ चॅम्पियन आहेस! तू भारताचा अभिमान आहेस आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहेस. आजचा धक्का नक्कीच सर्वासाठी दुःखदायक आहे पण मला माहित आहे की तू लढवय्यी आहेस आणि हार मानणारी नाहीस, तर तू पुन्हा एकदा आत्मविश्वासाने समोर ये ,आम्ही सगळे तुझ्या सोबत असू .. “
सूत्रांनुसार, पंतप्रधानांनी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पीटी उषा यांच्याशी यांच्याकडून या विषयावर माहिती घेतली आहे. आणि विनेशच्या अपात्रतेनंतर भारताकडे कोणते पर्याय असू शकतात याची प्राथमिक माहिती घेतल्याचे सांगण्यात आले आहे. जर विनेशला मदत होत असेल तर त्यांनी पीटी उषाला तिच्या अपात्रतेबद्दल तीव्र निषेध नोंदवण्याची विनंती केली आहे .
विनेश तिच्या ऐतिहासिक सुवर्णपदकापासून फक्त एक पाऊल दूर होती, पण त्याआधीच एक वाईट बातमी आली आहे. 50 किलो वजनी गटात सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी तिचे वजन अपेक्षित वजनापेक्षा १०० ग्रॅम जास्त असल्याने ऑलिम्पिक समितीकडून तिला अपात्र ठरवण्यात आले आहे. हा धक्का भारतासाठी मोठा आहे आणि देशवासी आता तिचे सांत्वन करत आहेत. तसेच याआधीच्या विनेशच्या अभिमानास्पद कामगिरीसाठी तिच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे.