सध्या फ्रांस देशाच्या पॅरिस या ठिकाणी ऑलम्पिक स्पर्धा सुरू आहे. या पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला पहिले पदक मिळवून देणारी महिला नेमबाज मनू भाकर आज मायदेशी परतली आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिचे भव्य स्वागत करण्यात आले. विमानतळावर ढोल-ताशांच्या गजरात तिचे स्वागत करण्यात आले. दुहेरी पदक विजेती मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधून परतल्यानंतर दिल्लीत झालेल्या भव्य स्वागताबद्दल आनंद व्यक्त केला. त्याच्या स्वागतासाठी तिचे आई-वडीलही विमानतळावर उपस्थित होते.
यावेळी ऑलम्पिक पदक विजेती मनू भाकर हिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ती म्हणाली, “विमानतळावर आणि हॉटेलमध्ये ज्या प्रकारे माझे स्वागत झाले त्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे. कार्यक्रमाच्या वेळी मी केवळ माझ्या खेळाचा विचार करत होते, पदकाचा नाही. मी बरेच दिवस भारतीय पदार्थ खाऊ शकले नाही पण दिल्लीत आल्यानंतर मी आलू पराठा खाल्ला.”
मनू भाकरने 12 वर्षांची प्रतीक्षा संपवली आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2 कांस्यपदक जिंकले. प्रथम तिने 10 मीटर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले आणि नंतर 10 मीटर मिश्र सांघिक एअर पिस्तूल स्पर्धेत सरबज्योत सिंगसह कांस्यपदक जिंकले. यासह मनूने इतिहास रचला. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती पहिली महिला भारतीय नेमबाज ठरली आहे.