Rahul Gandhi : केरळच्या वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनावर बुधवारी लोकसभेत बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला ही “राष्ट्रीय आपत्ती” घोषित करण्याची, बाधित लोकांसाठी सर्वसमावेशक पुनर्वसन पॅकेज देण्याची आणि लोकांना भरपाई देण्याची मागणी केली आहे.
राहुल गांधी म्हणाले, “मी काही दिवसांपूर्वी माझ्या बहिणीसोबत (प्रियांका गांधी ) वायनाडला भेट दिली होती आणि या दुर्घटनेमुळे झालेला विध्वंस, वेदना आणि दुःख मी प्रत्यक्ष पाहिले. “200 हून अधिक लोक मारले गेले आहेत आणि बरेच लोक बेपत्ता आहेत, तर मृतांचा आकडा 400 पेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.
यावेळी राहुल गांधी यांनी परिसरात शोध आणि बचाव कार्यात काम करणाऱ्या विविध विभागांच्या कामाचे कौतुक केले. “संपूर्ण समुदाय एकत्र येऊन मदत करत असल्याचे पाहून खूप आनंद झाला,” असे ते म्हणाले.
पुढे म्हणाले, “मी केंद्र सरकारला सर्वसमावेशक पुनर्वसन पॅकेज देण्याची, लोकांना दिलेली भरपाई वाढवण्याची आणि वायनाड भूस्खलनाला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची विनंती करतो.” यावेळी गांधी यांनी केंद्र आणि केरळ राज्य सरकार तसेच एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर, नौदल, तटरक्षक दल, अग्निशमन विभाग आणि इतर जवानांच्या कार्याचे आणि कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणासह शेजारील राज्यांकडून मिळालेल्या मदतीचे कौतुक केले.
भूस्खलनात आत्तापर्यंत 300 हून अधिक लोकांचा मृत्यू
केरळमधील वायनाड येथे 30 जुलै रोजी पहाटे भूस्खलन झाले. या दुर्घटनेला आता नऊ दिवस उलटून गेले तरी अजूनही येथे बचाव कर्ज सुरु आहे. या दुर्घटनेत अत्तापर्यंत 300 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. बरेच लोक बेपत्ता आहेत. मुंडक्काई, चुरलमाला, अट्टामाला आणि नूलपुझा या भूस्खलनग्रस्त भागातील गावांमध्ये सहा झोनमध्ये आणखीनही बचाव कार्य सुरु आहे.