बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांनी कांदा निर्यात तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. परिस्थिती स्थिर झाल्यानंतरच निर्यात पुन्हा सुरू होईल अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
बांगलादेश भारतातून सर्वाधिक कांदा आयात करतो, आणि २०२२-२३ मध्ये भारताने २४,८१४ टन कांदा निर्यात करून १५५५ कोटींचे परकीय चलन मिळवले. महाराष्ट्रातील नाशिक, छत्रपती संभाजी नगर, सोलापूर आणि पुणे येथून सर्वाधिक कांदा निर्यात होतो, यात नाशिकचा ७० टक्के वाटा आहे.राजकीय अस्थिरतेमुळे ७० ट्रक सीमेवर अडकले होते, त्यातील काहींना परवानगी मिळाल्याने ते बांगलादेशात पोचले आहेत. उर्वरित ट्रक लवकरच पोचतील. मात्र, व्यापारी सावध भूमिका घेत असून, परिस्थिती आटोक्यात आल्याशिवाय किंवा आर्थिक हमी मिळाल्याशिवाय नव्या निर्यातीसाठी ते तयार नाहीत.
बांगलादेशातील अस्थिरतेमुळे कांद्याच्या निर्यातीवर मोठा परिणाम होऊ शकतो, कारण बांगलादेशला भारताच्या उन्हाळी कांद्याचा मुख्य आधार आहे. चीनकडून कांदा येण्यास वेळ लागत असल्याने, भारताचा कांदा हा त्यांचा प्रमुख पर्याय आहे. त्यामुळे परिस्थिती सुधारल्यानंतरच निर्यातीचा निर्णय घेतला जाईल, असे फलोत्पादन निर्यातदार संघटनेने स्पष्ट केले आहे.
सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीनुसार, वर्ष 2023-24 मध्ये भारतातून होणाऱ्या एकूण कांदा निर्यातीपैकी 20.3 टक्के कांदा हा बांगलादेशात जातो. बांगलादेश हा प्रमुख आयातदारांपैकी एक आहे. गेल्या दीड महिन्यापासून सुरु असलेल्या बांगलादेशातील हिंसाचाराचा मोठा परिणाम व्यापारावर झालेला दिसून आला आहे. बांगलादेशची आर्थिक परिस्थिती सध्या नाजूक आहे. बांगलादेशच्या चलनाचे जवळपास 20 टक्क्यांनी अवमूल्यन झाले आहे. त्याचा परिणाम व्यापारावर दिसून येत आहे.