Maharashtra Politics : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलेला आहे. महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत राजकीय नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्र्र दौऱ्यावर असून, दुसरीकडे उद्धव ठाकरे दिल्लीत गाठीभेटी घेत आहेत. अशातच आता भाजपनेही कंबर कसली आहे.
विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधीच भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप लवकरच महाराष्ट्रात 30 ते 40 जागांची घोषणा करू शकते. यातील बहुतांश जागा त्या असतील जिथं गेल्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता, किंवा खूप कमी फरकाने विजय झाला होता. तसंच, आरक्षित जागांचा देखील समावेश असणार आहे.
गेल्यावर्षी डिसेंबर 2023 मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये देखील भाजपने असाच प्रयोग भाजपने केला होता, ज्याचा बराच फायदा झाला होता. त्यामुळे आता भाजपने महाराष्ट्रातही हीच रणनीती अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. याचा भाजपला किती फायदा होणार, आता ते येणारा काळच सांगेल.
येत्या काही दिवसांमध्ये निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. साधारण 20 सप्टेंबरच्या आसपास विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वीच भाजपकडून उमेदवारी यादी जाहीर केली जाऊ शकते.
लोकसभा निवडणुकीत महायुतीचे जागावाटप बराचकाळ रखडले होते. त्यामुळे त्यांना मोठा फटका बसला होता. हाच अनुभव लक्षात घेता आता भाजपकडून विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच 30 ते 40 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली जाऊ शकते.