MNS 4th Candidate Declared : आगामी विधानसभा निवडणुक स्वबळावर लढवणार असल्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मनसेने आपल्या चौथ्या उमेदवाराची घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला जाहीर पाठिंबा देणाऱ्या मनसेने विधानसभा निवडणुक मात्र स्वबळावर लढणार असल्याचे बोलले होते आणि ते पाहायला देखील मिळाले.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्र्र दौऱ्यावर असून सोलापूर, धाराशिव, लातूर दौरा करुन ते आज हिंगोलीत (Hingoli) पोहोचले आहेत. हिंगोलीत त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले, हिंगोलीत पोहचल्या नंतर त्यांनी येथील मनसे पदाधिकाऱ्यांशी बैठक घेतली, या बैठकीत त्यांनी हिंगोली विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा केली आहे. हिंगोली विधानसभेतून मनसेचे जिल्हाप्रमुख बंडू कुठे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची जोरदार तयारी
मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा-नवनिर्माण यात्रा सुरु असून सोमवारी सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे राज ठाकरे यांनी मनसेच्या दोन विधानसभा उमेदवारांची घोषणा केली होती. त्यामध्ये, 1. शिवडी विधानसभा : बाळा नांदगांवकर आणि सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर विधानसभा : दिलीप धोत्रे यांना तिकीट देण्यात आले. त्यानंतर, लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून संतोष नागरगोजे यांना मैदानात उतरवण्यात आले, आणि आता हिंगोली मतदारसंघातून बंडू कुठे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.