Wayanad landslides : शुक्रवारी सकाळी, केरळच्या भूस्खलनग्रस्त वायनाड जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी भूगर्भातून मोठा आवाज ऐकू येत असल्याच्या बातम्या येत आहेत, ज्यामुळे स्थानिक लोक आणि अधिकाऱ्यांमध्ये भीतीची परिस्थिती निर्माण झाली आहे. अधिकाऱ्यांकडून भूस्खलनग्रस्त निवासी भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.
वायनाड मधील अंबलावायल गावात आणि व्याथिरी तालुक्यातील काही भागात मोठा आवाज ऐकू आला. वायनाडचे जिल्हा दंडाधिकारी डी.आर. मेघश्रीने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘जिल्हा प्रशासनाने बाधित भागातून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी पावले उचलली आहेत.’ केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (KSDMA) ने म्हटले आहे की, ते भूकंपाच्या ‘रेकॉर्ड्स’ तपासत आहेत आणि स्थानिक पातळीवर त्वरित कारवाई करत आहेत. तसेच परिस्थिती तपासली जात आहे.
“आतापर्यंत भूकंपाच्या नोंदींमध्ये हालचालीचे कोणतेही संकेत नाहीत,” असे पंचायत प्रभागातील एका सदस्याने एका टीव्ही चॅनेलला सांगितले. सकाळी 10:15 च्या सुमारास हा आवाज ऐकू आला असल्याचे सांगण्यात येत आहे.
डोंगराळ जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या भूस्खलनात २२६ जणांचा मृत्यू आणि अनेक बेपत्ता झाल्यानंतर, जमिनीखालून निघणाऱ्या गूढ आवाजामुळे स्थानिक लोकांमध्ये घबराटीची परिस्थिती निर्माण झाली आहे.
10 ऑगस्टला पंतप्रधानांची भेट
वायनाडमध्ये भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले होते. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी 10 ऑगस्ट रोजी भूस्खलनग्रस्त भागाला भेट देणार आहेत. मानवी अवयव आणि अज्ञात मृतदेहांच्या डीएनए चाचणीचे निकाल आल्यानंतरच भूस्खलनात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची नेमकी संख्या निश्चित होऊ शकेल, असेही विजयन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच 131 लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.