महाराष्ट्रात शिवसेना यूबीटी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यात संघर्ष वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर नारळ, माती आणि बांगड्या फेकून निदर्शने केली होती. यानंतर रविवारी शिवसेनेच्या यूबीटी कार्यकर्त्यांनी कोल्हापूर शहरात राज ठाकरे यांचा बॅनर फाडला. रविवारी सकाळीही माजी खासदार आणि उद्धव ठाकरे गटनेते राजन साळवी यांनी मनसे कार्यकर्त्यांना आव्हान देत, हिंमत असेल तर पुढे या, असे आव्हान दिले.
खरे तर महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, असे मनसे नेते राज ठाकरे यांनी तीन दिवसांपूर्वी सोलापुरात सांगितले होते. राज ठाकरेंच्या या वक्तव्याचा निषेध करत शुक्रवारी बीड जिल्ह्यात मराठा कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपारी फेकून निदर्शने केली होती. यानंतर शनिवारी ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर नारळ फेकून निदर्शने केली. या प्रक्रियेनंतर आज कोल्हापुरात उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी मनसेचे पोस्टर फाडून निषेध व्यक्त केला. याप्रकरणी राज्य सरकारने कठोर कारवाई न केल्यास हा वाद आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झालेली दिसत आहे.
दरम्यान “तुम्ही बांगड्या फेकल्या म्हणजे फार मोठा पराक्रम दाखवला का? अख्ख्या मराठवाड्यात राज ठाकरेंना फिरायला लोकांनी जागा ठेवली नाही जाल तिथे नाकेबंदी केली, तुम्हाला तुमचा दौरा गुंडाळावा लागला,असे वक्तव्य शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अमरावती येथे बोलताना केले आहे. अपने इलाखे मे तो कुत्ता भी शेर होता है.. मजा तो तब है इलाका तुम्हारा और धमाका हमारा” असेही त्या म्हणाल्या आहेत.
अमरावती शहराच्या सांस्कृतिक भवन मध्ये स्व.मा साहेब मीनाताई ठाकरे स्त्री शक्ती सन्मान पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी उपस्थितांना संबोधित करतांना अंधारे यांनी आपले मत व्यक्त केले आहे . यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
आता सुषमा अंधारे यांच्या या आक्रमक वक्तव्यानंतर मनसे आणि उबाठा यांच्यातला वाद चिघळण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.