Sheikh Hasina : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी अमेरिकेवर मोठा आरोप केला आहे. सध्या भारतात वास्तव्यास असलेल्या शेख हसीना यांचे म्हणणे आहे की, सेंट मार्टिन बेट त्यांनी न दिल्याने अमेरिकेने त्यांना सत्तेवरून हटवले आहे. शेख हसीना यांचे म्हणणे आहे की, अमेरिकेला सेंट मार्टिन बेट मिळाल्यानंतर बंगालच्या उपसागरावर अमेरिकेचा प्रभाव वाढला असता.
तसेच शेख हसीना यांनी बांगलादेशी नागरिकांना कट्टरपंथीयांकडून दिशाभूल न होण्याचे आवाहन केले आहे. पुढे आपल्या संदेशात शेख हसीना म्हणाल्या, “मला मृतदेहांची मिरवणूक बघावी लागू नये म्हणून मी राजीनामा दिला. त्यांना विद्यार्थ्यांच्या मृतदेहांवर सत्तेत यायचे होते, पण मी हे होऊ न देता पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.”
कट्टरपंथीयांच्याकडून दिशाभूल न होण्याचे आवाहन
हसीना पुढे म्हणाल्या, “मी जर सेंट मार्टिन बेटाचे सार्वभौमत्व सोडले असते आणि अमेरिकेला बंगालच्या उपसागरावर प्रभाव पाडण्याची परवानगी दिली असती तर मी सत्तेत राहू शकले असते. मी माझ्या देशातील जनतेला विनंती करते, कृपया त्यांनी कट्टरपंथीयांकडून दिशाभूल होऊ नये.”
लवकरच परत येईन
तसेच शेख हसीना पुढे म्हणतात, “मी जर देशात राहिले असते, तर आणखी जीव गमावले असते, आणि अधिक संसाधने नष्ट झाली असती. मी देश सोडण्याचा अतिशय कठीण निर्णय घेतला. मी तुमची नेता बनले, कारण तुम्ही मला निवडले. तुम्ही माझी शक्ती होतात. अनेक नेत्यांची हत्या झाली, कार्यकर्त्यांचा छळ झाला आणि त्यांच्या घरांची तोडफोड आणि जाळपोळ झाली, ही बातमी ऐकून मला अश्रू अनावर झाले आहेत…अल्लाहच्या कृपेने मी लवकरच परत येईन.
“मी बांगलादेशच्या भविष्यासाठी नेहमी प्रार्थना करेन, ज्या राष्ट्रासाठी माझ्या महान वडिलांनी लढा दिला…ज्या राष्ट्रासाठी माझ्या वडिलांनी आणि कुटुंबाने आपले प्राण दिले.”
पुढे आरक्षण आंदोलन आणि विद्यार्थ्यांच्या निदर्शनांचा संदर्भ देताना हसीना म्हणाल्या, “मी बांगलादेशातील तरुण विद्यार्थ्यांना पुन्हा सांगू इच्छिते की, मी तुम्हाला रझाकार कधीच म्हटले नाही…पण तुम्हाला भडकवून देण्यासाठी माझे शब्द फिरवले गेले. मी तुम्हाला पुन्हा सांगू इच्छिते. त्या दिवसाचा संपूर्ण व्हिडिओ पाहा. षड्यंत्रकर्त्यांनी तुमच्या भाबडेपणाचा फायदा घेतला आणि राष्ट्र अस्थिर करण्यासाठी तुमचा वापर केला.”