Sandeep Valmiki : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. अशातच एक बातमी समोर येत आहे. आम आदमी पार्टीच्या दिल्ली सरकारमधील माजी मंत्री संदीप वाल्मिकी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या तीन तासांनी त्यांची हकालपट्टी करण्यात आली. नेमके काय आहे प्रकरण पाहूया…
शनिवारी हरियाणातील पंचकुलामध्ये मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांच्या उपस्थितीत संदीप वाल्मिकी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. मुख्यमंत्र्यांनीच त्यांना पक्षात प्रवेश दिला होता. मात्र २४ तासांनंतरच त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
खरं तर, मुख्यमंत्री सैनी यांनी वाल्मिकी यांचे फेटा बांधून पक्षात स्वागत केले. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर काही वेळाने संदीप वाल्मिकी यांच्याशी संबंधित जुने वाद सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. याच पार्श्ववभूमीवर भाजपने कारवाई ही केली. संदीपने आपल्यावरील गंभीर आरोपांशी संबंधित तथ्य लपवून पक्षाची दिशाभूल केल्याचा आरोप आहे. यानंतर पक्षाने त्यांची हकालपट्टी केली.
भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुरेंद्र पुनिया यांनी जारी केलेल्या पत्रात दिल्लीचे माजी मंत्री संदीप वाल्मिकी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, मात्र त्यांनी आपली पार्श्वभूमी लपवली होती, अशी माहिती देण्यात आली आहे. वस्तुस्थिती समोर येताच भाजपने संदीप यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून काढून टाकले. यापुढील काळात संदीप कोणत्याही प्रकारे पक्षाशी संबंधित राहणार नसल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले.
या प्रकरणी केली कारवाई
वास्तविक, संदीप वाल्मिकी हे आम आदमी पक्षाच्या दिल्ली सरकारमध्ये महिला आणि बालविकास मंत्री होते. 2016 मध्ये रेशनकार्ड बनवण्याच्या वादग्रस्त प्रकरणात एका महिलेने त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संदीप यांना मंत्रीपदावरून हटवले आणि त्यांची पक्षातून हकालपट्टीही केली.