शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शनिवारी ठाण्यात झालेल्या मेळाव्यात मनसैनिकांनी एकच गोंधळ केला. ठाकरे यांच्या गाडीवर शेणाचे गोळे, नारळ, टोमॅटो तसेच बांगड्याही फेकण्यात आल्या. काही जणांनी दगड फेकण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकडही केली. यावर ॲक्शनला रिॲक्शन असते ती पाहायला मिळाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे .
गेल्या आठवड्यात ठाकरे गटाच्या नेत्यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीबाज असा केला होता. त्यानंतर राज ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी बीडमध्ये त्यांच्या गाडीसमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या फेकल्या होत्या. शिवाय त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. त्याला मनसेकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. त्याचाच एक भाग ठाण्यात शिवसेना आणि मनसेमध्ये राडा झालेला पाहायला मिळाला.
काही लोक मला मुख्यमंत्री करा म्हणून कटोरा घेऊन फिरतात – मुख्यमंत्री
यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सरकार स्थापन झाल्यापासून पडणार म्हणाले पण सरकार मजबूत झालं. शिवसेना आणि धनुष्यबाण वाचवण्यासाठी आम्ही असा निर्णय घेतला. लोकसभेला पण जर स्ट्राईक रेट पाहिला तर लोकांची पसंती कोणाला आहे हे आम्हाला सांगायची गरज नाही. ठाण्यातील लोकांना औषध द्यायला जमतं, त्यांनी बरोबर जमलगोटा दिलाय. दिल्लीतून मातोश्रीमध्ये बैठका होत होत्या पण आता दिल्लीकडे लोटांगण घातली जात आहे. माझ्या दाढीची त्यांना धास्ती आहे. या दाढीनेच त्यांची गाडी खड्ड्यात घातली. बाळासाहेब असते तर त्यांना जंगलामध्ये फोटोग्राफीसाठी पाठवलं असतं. आता काही लोक मला मुख्यमंत्री करा म्हणून कटोरा घेऊन फिरतात. माझ्या लाडक्या बहिणींना एकच सांगायचं आहे की कपटी भावापासून सावध राहा, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला.
दरम्यान पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या महिला मनसैनिकांची सुटका केली. त्यानंतर त्या महिला कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना व्हिडिओ कॉल लावून जल्लोष केला.
ठाण्यात उद्धव ठाकरेंविरोधात मनसैनिकांनी राडा केला. याबाबत आपल्याला कल्पना नसल्याचे यावेळी मनसे नेते संदिप देशपांडे यांनी सांगितले. मात्र बीडमध्ये जी ॲक्शन झाली त्याची रिॲक्शन ठाण्यात झाली असे ते म्हणाले. आमच्या नेत्याच्या गाडीवर जर सुपाऱ्या फेकणार असाल, तर अशा घटना ह्या होणारच असेही ते म्हणाले आहेत. .