Pune : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आपल्या दौऱ्याला सुरूवात केली आहे. सध्या जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थित आज पुण्यात शांतता रॅली काढण्यात येत आहे. त्यांच्या शांतता रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने मराठा बांधव जमा झाले आहेत. दरम्यान, या रॅलीत मनोज जरांगे पाटील ‘भावी मुख्यमंत्री’ असे पोस्टर झळकले आहेत.
‘मनोज जरांगे भावी मुख्यमंत्री’ असा आशय असलेले पोस्टर मराठा बांधवांनी हाती घेतल्याचे दिसून आले. आजच्या रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी करण्यात आली.
मनोज जरांगे हे मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी सरकारला अनेकवेळा अल्टिमेटम दिला आहे, पण सरकारकडून त्याची अंमलबजावणी झालेली नाही.
याच पार्श्वभूमीवर त्यांनी विधानसभा निवडणुका लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यासाठी त्यांनी तयारी देखील सुरु आहेत. यासंदर्भातील अंतिम निर्णय ते २९ ऑगस्ट रोजी जाहीर करणार असल्याचे बोलले आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.