Eknath Shinde : कोल्हापुरातील प्रसिद्ध नाट्यगृह अशी ओळख असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला ८ ऑगस्ट रोजी आग लागली. आगीच्या प्रचंड ज्वालांनी नाट्यगृहाचे मोठे नुकसान झाले.
केशवराव भोसले नाट्यगृह हे वारसा हक्क स्थळापैकी एक आहे. अलीकडेच वारसा स्थळाला अनुसरून या नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्यात आले होते. हे केशवराव भोसले नाट्यगृह बहुतांश लाकडापासून बांधले असल्याने आगीने लगेच रौद्ररुप धारण केल्याचे दिसून आले.
दरम्यान, या ऐतिहासिक नाट्यगृहासाठी शासनाकडून आता २० कोटींची आर्थिक मदत देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथे केली. त्यांनी आगीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली.
यावेळी ते म्हणाले, ८ ऑगस्ट रोजी केशवराव भोसले नाट्यगृह आगीत जळून खाक झालं ही अतिशय दुर्देवी घटना आहे. हे नाट्यगृह युध्दपातळीवर कोल्हापुरवासियांसाठी पुन्हा उभे करण्यासाठी महानगरपालिकेने तयार केलेल्या आराखड्यानुसार २५ कोटी रूपयांची गरज आहे.नाट्यगृहाचा विमा ५ कोटींचा होता. उर्वरीत रक्कम शासनाकडून दिली जाईल. असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.