महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत फेक नरेटीव्ह सोशल मिडियाच्या माध्यमातून पसरवले गेले. त्याची गंभीर दखल घेतली असून आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वांचीच पोलखोल करणार असल्याचे भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे . ते अकोल्यात पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना संबोधित करत होते.
फडणवीस म्हणाले की , पाचव्या सहाव्या क्रमांकावर गेलेला महाराष्ट्र उद्योगात आपण क्रमांक एक वर आणला. आज बुलढाण्यापासून ते गडचिरोलीपर्यंत गुंतवणूक होते आहे. सोशल मिडियावर गावोगावातील लोक आहेत. जाणते लोकही आता सोशल मिडियावर अॅक्टिव झाले आहेत. आपल्यालाही ती ताकद उभी करावी लागेल. आपले ग्रुप तयार करून ते ग्रुप ऍक्टिवेट करावे लागतील. पोलखोल नावाचा उपक्रम सुरू करणार आहोत.
ही पोलखोल तुम्हाला पाठवली जाईल. पण तुम्ही ती तुमच्याच फोनमध्ये ठेवली, तर त्याचा काही उपयोग होणार नाही. तर आपल्या शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत ती पोहोचली पाहिजे. त्यांच्याकडून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत ती पोहोचली पाहिजे. तरच विरोधकांचा खोटा चेहरा आपल्याला उघड करता येईल. यासाठी सर्वांना सोशल मिडियावर अॅक्टीव्ह होण्याची गरज आहेत, असे फडणवीस म्हणाले.
आज बांगलादेशचा उल्लेख झाला. त्यासाठीही लोकांना जागे करावे लागेल. जेथे हिंदू निर्बल होतो, तेथे त्याला गुलामीचा सामना करावा लागतो. जेथे बलवान असतो, तेथे राज्य करतो. जातीपाती आपण मानत नाही. पण बांगलादेशमध्ये आमच्या हिंदूंवर अत्याचार होत आहेत . तोच प्रयत्न येथेही सुरू आहे. जो आपल्याला थांबवायचा आहे असे फडणवीस म्हणले आहेत.