राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत 150 पेक्षा अधिक जागा लढवण्याचा भाजपचा निर्धार कायम असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. कारण भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनी पुन्हा एकदा विधानसभेला पक्षाने 150 जागा लढवणे कशाप्रकारे आवश्यक आहे, हा मुद्दा उचलून धरला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रात अमित शाह यांचे विश्वासू असलेले भूपेंद्र यादव यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून भूपेंद्र यादव सध्या महाराष्ट्रात चांगलेच सक्रिय झालेले दिसून येत आहेत.
त्याच पार्श्वभूमीवर नुकतीच भाजपच्या कोअर कमिटीच्या नेत्यांची बैठक पार पडली. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार झाली. भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीला भूपेंद्र यादव, विनोद तावडे उपस्थित होते. या बैठकीत विधानसभा निवडणूक, जागावाटप, जागांची निवड यांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे.
आज मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर एक बैठक होणार आहे. या बैठकीला प्रभारी भूपेंद्र यादव,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,महामंत्री संजय केनेकर,विजय चौधरी,विक्रांत पाटील,माधवी नाईक,चित्रा वाघ आणि श्रीकांत भारतीय उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील पाच महामंत्र्यांकडून विभागीय संघटनात्मक आढावा घेतला जाईल. तसेच अमित शहा 16,17,18 तीन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. यासंदर्भातील देखील नियोजनाचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कोणते निर्णय घेतले जातात, ह्याकडे लक्ष राहणार आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना विधानसभानिहाय मिळालेली मते आणि गेल्या विधानसभेत मिळालेली मते त्याचप्रमाणे सर्वेक्षण अहवाल याच्या आधारे विधानसभा निहाय उमेदवार निवडले जाणार आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये ज्या पक्षाने ज्या जागा जिंकल्या ती जागा त्याच पक्षाकडे राहील. मात्र काही मोजक्या जागा आहेत त्यामध्ये फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि त्यानुसार भाजपकडे जागांचे वर्चस्व राहील असे सांगितले जात आहे.