Farooq Abdullah statement on Indian Army : आपल्या वादग्रस वक्तव्यांमुळे अनेकदा वादात सापडलेले जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला हे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. यावेळी त्यांनी सुरक्षा दलांचे दहशतवाद्यांशी संगनमत असल्याचा आरोप केला आहे.
एनसी नेत्याने आरोप केला आहे की, भारतीय लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये खोलवर संबंध आहेत. सीमेवर मोठ्या प्रमाणात सैनिक तैनाती असूनही सीमेपलीकडून अंतगवादी घुसखोरी करत आहेत.
जम्मू-काश्मीर मधील अनंतनागमध्ये शनिवारी दुपारी झालेल्या चकमकीनंतर फारुख अब्दुल्ला यांचे हे वक्तव्य आले आहे. या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद झाले, तर एका नागरिकाचाही मृत्यू झाला. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर माहितीच्या आधारे लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी अनंतनागच्या अहलान भागात शोध मोहीम सुरू केली होती. या भागात दोन दहशतवादी लपल्याची बातमी आली होती.
लष्कराच्या म्हणण्यानुसार, शोधमोहीम दरम्यान, त्यांना घेरण्यात आले तेव्हा दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, ज्यानंतर चकमक सुरू झाली. या चकमकीत लष्कराचे नुकसान झाले आणि दोन जवान शहीद झाले. तसेच दोन जवान जखमी झाले आहेत.
पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी संघटनेची कव्हर ऑर्गनायझेशन असलेल्या काश्मीर टायगर्सने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. काश्मीर टायगर्सने एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘काश्मीरच्या स्वातंत्र्यापर्यंत हे युद्ध सुरूच राहील.’