Sanjay Raut : वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानाबाहेर शनिवारी काही लोकांचा जमाव आला आणि घोषणाबाजी करू लागला. यावरच आता शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत ही सगळी माणसं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असल्याचे म्हंटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैसे देऊन, ही माणसं पाठवली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे, तसेच ही सर्व सुपारीबाज माणसं वर्षावर किंवा मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी असतात, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी पुराव्यानिशी केला आहे. सोमवारी मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी बोलताना संजय राऊत यांनी एकामागोमाग एक फोटो दाखवत यांची ‘कुंडली’ बाहेर काढली आहे.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “मातोश्रीच्या बाहेर वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाच्या निमित्ताने 10-20 लोकं आले आणि घोषणाबाजी करून गेले. अद्याप या कायद्यातील सुधारणांवर संसदेत चर्चा व्हायची आहे. हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे चर्चेसाठी गेलेले आहे. त्या समितीत सर्वपक्षीय लोकं असतात. त्यात चर्चा होईल, पण त्याआधीच मुंबईतील आणि महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्यासाठी बेईमान मिंधे गटाच्या लोकांनी मातोश्रीवर काही मुस्लिम समाजाची लोकं पाठवली.” यावेळी राऊत यांनी काही फोटोही दाखवली.
मातोश्रीबाहेर आंदोलन करणारा सलमान शेख, अफरात सिद्दीकी, इलियास शेख, अकरम शेख, झिशान चौधरी, इम्रान शेख, अकबर सय्यद यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नीसोबतचे फोटो संजय राऊत यांनी माध्यमांसमोर आणले.
पुढे ते म्हणाले, “सुपारी गँगचे कार्यकर्ते वक्फ बोर्डाच्या कायद्याबाबत आमची भूमिका जाणून घेण्यासाठी आले होते. या सुपारी गँगचे नेते वर्षा आणि मंत्रालयाच्या 6 मजल्यावर बसतात. ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या कारवर हल्ला करणारे सुद्धा सुपारी गँगचे कार्यकर्ते आहेत. सुपारी गँगचे सरदार अहमद शहा अब्दाली दिल्लीत बसले आहेत. हे सर्व नाटक जनता पाहत आहे. भाड्यांचे कार्यकर्ते आणून आमच्याविरोधात तमाशा केला जात आहे. असा आरोप करत सत्ताबदल झाल्यावर तेव्हा बघून घेऊन असा दमही राऊत यांनी यावेळी दिला आहे.