मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या दौऱ्याला बीडमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्याने मनसे विरुद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना असा वाद रंगलेला पहायला मिळतो आहे. त्यावरुन, नेत्यांच्या कारवर सुपाऱ्या, नारळ, शेण भिरकावल्याचं दिसून आले होते. आता, नागपूरमध्ये मनसेसैनिकांनी पुन्हा एकदा आक्रमक होत टोलनाका फोडल्याचे वृत्त समोर आले आहे.
शहराच्या तीस किलोमीटरच्या परीसरात टोलनाका नको असा नियम असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नागपूरमध्ये वाहनधारकांकडून टोल आकारला जात असल्याचा आरोप करत मनसेने हे आंदोलन केले. याप्रकरणी पोलिसांनी 5 मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
नागपूरजवळच्या वाडी शहराच्या अवतीभवती राज्य महामार्गावर 10 किलोमीटरच्या अंतरामध्येच तीन टोलनाके आहेत. या तीनही टोलनाक्यांवर खासगी वाहनांकडून टोल वसूल केला जात नाही. मात्र, वाणिज्यीक वाहनांकडून (माल वाहतूक करणारे वाहन) टोल वसुल केला जातो. त्यामुळे अगदी जवळ जवळ असलेल्या टोलनाक्यांमुळे माल वाहतूकदार त्रस्त झाले होते. माल वाहतूकदारांच्या या तक्रारीनंतर मनसेने आज येथील टोलनाक्यावर जाऊन खळ खट्याक स्टाईलने आंदोलन केल्याचे आज दिसून आले आहे.
सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकला चलो रे चा नारा देत जशाच तसे उत्तर देऊ असे सांगितले आहे. त्यामुळे, आता मनसैनिक निवडणुकांच्या अगोदरच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच, नागपूरजवळ आता मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी टोलनाक्यावर तोडफोड करुन त्यांच्या खळखट्याक आंदोलनाची आठवण करुन दिली आहे.