Sharad Pawar On Raj Thackeray : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका आता सुरु झाली आहे. दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्यावेळी शरद पवार यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते, राज ठाकरेंच्या या आरोपांना आता शरद पवारांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
शरद पवारांनी महाराष्ट्राचं मणिपूर करायला, तसंच जातीचे राजकारण पसरवण्यात हातभार लावू नये, अशी टिप्पणी राज ठाकरे यांनी केली होती, यावर आता खुद्द शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत भाष्य करत होते. राज ठाकरेंनी दोन- तीन वेळा माझे नाव का घेतले हे मला माहीत नाही. कारण मी या रस्त्याने कधीच जात नाही, तसा माझा इतिहास नाही, असे प्रत्युत्तर शरद पवार यांनी राज ठाकरे यांना दिले आहे.
पवार म्हणाले, “मणिपूरचा प्रश्न वेगळा आहे. हातभार लावण्याचा प्रश्न कुठे येतो. मी बोललो हे हातभाराचे लक्षण आहे की सौजन्याचे लक्षण आहे? राज ठाकरे यांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. मी महाराष्ट्रात नेहमीच सकारात्मक बदलांसाठी प्रयत्नशील असतो आणि महाराष्ट्रातील जनतेला माझी भूमिका चांगलीच कळते,”
तसेच ते पुढे म्हणाले, “मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांकडे बैठक होणार आहे. त्यावेळी यावर निर्णय घेता येईल. माझे वैयक्तीक मतं हे आरक्षणाची मर्यादा ही 50 टक्कापेक्षा जास्त असावी, असे आहे. मात्र ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही असा न्यायालयाचा निर्णय आहे. ही मर्यादा ओलांडण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे आहे.”