आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेच्या वतीने शिव सर्वेक्षण अभियान राबविण्यात येणार असून यानिमित्ताने शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे अकोला दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय आढावा घेण्यात येणार असून उमेदवारांची चाचपणी करण्यात येणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाची मजबूत बांधणी व निवडणुकीची आखणी करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने शिव सर्वेक्षण अभियान राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने शिवसेना नेते खा. संजय राऊत हे अकोला दौऱ्यावर येत असून 13 ऑगस्ट रोजी रात्रीला ते अकोल्यात पोहचणार आहेत. त्यानंतर 14 ऑगस्ट रोजी 11 ते 2 या वेळेत हॉटेल आरएस, रेल्वे स्टेशन येथे जिल्हा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची व सर्व आघाड्यांची विधानसभा निवडणुक या विषयावर विधानसभा निहाय चर्चा करण्यात येणार आहे.
अकोला पश्चिम, अकोला पूर्व, अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर, रिसोड या विधानसभानिहाय आढावा घेण्यात येणार आहे. या बैठकीला शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, सर्व शहरप्रमुख, संघटक, समन्वयक, आजी माजी आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, आजी माजी नगरसेवक, आजी माजी आमदार, महिला आघाडी, शेतकरी सेनेच्या आजी माजी पदाधिकाऱ्यानी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ. नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख तथा जि.प. सदस्य गोपाल दातकर, शहर प्रमुख राजेश मिश्रा राहुल कराळे यांनी केले आहे .
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा नुकताच झालेला दिल्ली दौरा या पार्श्वभूमीवर महत्वाचा ठरल्याचे दिसून येत आहे.या राज्यव्यापी सर्वेक्षणासाठी मातोश्रीच्या खास वर्तुळातील निरीक्षकाची निवड स्वतः उद्धव ठाकरेंनी केली आहे. जे आज आणि उद्या अश्या दोन दिवसात राज्यात आपल्या पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. या नावांमध्ये संजय राऊत यांच्यासह अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, विनायक राऊत, वरुण सरदेसाई यांच्यासारख्या २१ नेत्यांची निवड करण्यात आली आहे.