Gurmeet Ram Rahim : डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमला पुन्हा एकदा फर्लो मिळाली आहे. राम रहीमला २१ दिवसांची फर्लो मिळाली असून, आज मंगळवारी राम रहीम सुनरिया तुरुंगातून बाहेर आला आहे.
राम रहीमची मंगळवारी सकाळी 6.30 च्या सुमारास पोलीस संरक्षणात हरियाणाच्या सुनारिया तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. राम रहीम उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील बर्नावा आश्रमात फर्लो कालावधी घालवतील.
जून 2024 मध्ये फर्लोची मागणी केली होती
बलात्काराचा दोषी गुरमीत राम रहीम सिंग याने जून 2024 मध्ये पुन्हा एकदा सुट्टीची मागणी केली होती. राम रहीमने 21 दिवसांच्या फर्लोसाठी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याआधी फेब्रुवारीमध्ये हायकोर्टाने हरियाणा सरकारला डेरा सच्चा सौदाच्या प्रमुखाला त्यांच्या परवानगीशिवाय फरलो देऊ नये असे सांगितले होते. त्यावेळी उच्च न्यायालयात शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या याचिकेवर सुनावणी सुरू होती, ज्यामध्ये डेरा सच्चा सौदा प्रमुखाच्या तात्पुरत्या सुटकेला आव्हान देण्यात आले होते.
राम रहीम कोणत्या प्रकरणात शिक्षा भोगत आहे?
सिरसा येथील आश्रमात दोन महिला अनुयायांवर बलात्कार केल्याप्रकरणी राम रहीम 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. ऑगस्ट 2017 मध्ये पंचकुला येथील विशेष सीबीआय न्यायालयाने राम रहीमला दोषी ठरवले होते. याशिवाय डेरा माजी व्यवस्थापक रणजीत सिंग यांच्या हत्येप्रकरणी गुरमीत राम रहीमलाही न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
फर्लो म्हणजे काय?
फर्लो हा सुट्टीचा प्रकार आहे, ज्या अंतर्गत कैदीला काही दिवसांसाठी सोडले जाते. फर्लोचा कालावधी कैद्याच्या शिक्षेपासून आणि त्याच्या अधिकारातून दिलासा म्हणून पाहिला जातो. हे फक्त शिक्षा झालेल्या कैद्यांसाठीच उपलब्ध आहे. हे सहसा दीर्घकाळ शिक्षा भोगलेल्या कैद्यालाच दिले जाते. कैद्याला त्याचे कुटुंब आणि समाजातील सदस्यांना भेटता यावे, हा त्याचा उद्देश आहे. ते कोणत्याही कारणाशिवाय दिले जाऊ शकते. तुरुंग हा राज्याचा विषय असल्याने प्रत्येक राज्यात फर्लोबाबत वेगवेगळे नियम आहेत. उत्तर प्रदेशात फरलो देण्याची तरतूद नाही.