Sanjay Raut : विधानसभेसाठी तुमचे आशीर्वाद हवे आहेत. आमचे सरकार आले तर तुम्हाला देण्यात येणारे पैसे दीड हजारवरून तीन हजार करू. पण, ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही त्यांच्या खात्यातून दीड हजार रुपये काढून घेऊ. असे वक्तव्य काल आमदार रवी राणा यांनी केले होते, यावरूनच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे, तसेच आमची सत्ता आली तर आम्ही लाडकी बहीण योजनेचे (Ladki Bahin Yojana) पैसे वाढवू, असे वक्तव्य केले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात ‘माझी लाडकी बहीण योजनेची (CM Ladki Bahin Yojana) घोषणा केली. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. या योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धरले आहे. आता संजय राऊतांनी या योजनेवरून सत्ताधाऱ्यांना डिवचले आहे.
यावेळी संजय राऊत म्हणाले की, रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा पराभूत झाल्या आहेत आणि ते असे बोलतात. सगळे नेते असेच त्यांच्या सारखे बोलताय. पैसे काय यांच्या बापजाद्यांचे आहे का? यांची मानसिकता सरकारी पैशाने वोट विकत घ्यायची आहे. मात्र आमची सत्ता आली तर आम्ही योजनेचे पैसे वाढवू, असे त्यांनी म्हटले आहे. अजित पवार हे स्वतः बारामतीत पराभूत होतील. त्यांच्या लाडक्या बहिणी त्यांना पराभूत करतील. सगळे गद्दार आता विधानसभेत दिसणार नाहीत. राज्यातील लाडक्या बहिणी त्यांचा पराभव करतील. आमदारांना 50 कोटी, खासदारांना 100 कोटी तर नगरसेवकांची किंमत 5 कोटी आणि आमच्या लाडक्या बहिणींसाठी 1500 रुपये देता का? तेही मते दिली नाहीत तर पैसे परत घेण्याची भाषा करतात, असा खरपूस समाचार संजय राऊतांनी घेतली आहे.