Independence Day : मंत्री आतिशी दिल्लीत स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जागी ध्वजारोहण करणार होते. तुरुंगातून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 15 ऑगस्ट रोजी छत्रसाल स्टेडियमवर होणाऱ्या कार्यक्रमात आतिशी यांनी त्यांच्या जागी ध्वज फडकावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र हा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे.
दिल्ली सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने (जीएडी) केजरीवाल यांचा हा प्रस्ताव फेटाळला आहे. यानंतर आता दिल्लीत स्वातंत्र्य दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात आतिशी यांना राष्ट्रध्वज फडकवता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हा प्रस्ताव फेटाळताना नियमांचा हवाला देण्यात आला आहे.
केजरीवाल यांनी तुरुंगातून पत्र लिहिले होते
दारू घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 15 ऑगस्टला ध्वजारोहण करण्याबाबत उपराज्यपालांना पत्र लिहिले होते. पत्रात केजरीवाल यांनी 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्री आतिशी सिंह दिल्लीत ध्वजारोहण करतील असे सांगितले होते.
दिल्लीत दरवर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्ली सरकार छत्रसाल स्टेडियमवर एका कार्यक्रमाचे आयोजन करते, ज्यामध्ये मुख्यमंत्री ध्वजारोहण करतात. मात्र यावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात असल्याने त्यांनी आपल्या कॅबिनेट मंत्री आतिशी यांना ध्वजारोहण करण्याची परवानगी दिली होती. प्रशासनाने त्यांचे हे आदेश धुडकावून लावले आहेत.
याप्रकरणी मुख्यमंत्री केजरीवाल तुरुंगात
केजरीवाल सध्या दिल्लीतील तिहार तुरुंगात आहेत. दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रिंगचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. केजरीवाल यांना 5 ऑगस्ट रोजीच दिल्ली उच्च न्यायालयाकडून झटका बसला होता. अटकेला आव्हान देणारी त्यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली.