Sanjay Raut : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून, महाराष्ट्रातील मोठे नेते दिल्ली दौरा करत आहेत, तर काही नेते महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत, अशातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात ठाकरे-२ सरकार येणार असल्याचा मोठा दावा त्यांनी केला आहे.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “महायुतीला लोकसभेचा सर्व्हेही फायदेशीर नव्हता आणि विधानसभेचाही नाही. आम्हाला कोणत्याही सर्व्हेची गरज नाही. कोणत्याही परिस्थितीत राज्यात ठाकरे-२ सरकार येणार, म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार येणारच, हे कोणीही थांबवू शकत नाही. मग त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर कितीही घोषणा करू द्या. कितीही योजना आणा, पैशांचा धुरळा उडवा, मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करा.” असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे.
पुढे ते म्हणाले, निवडणुका तुम्हाला वेळेतच घ्याव्या लागतील. विधानसभेची निवडणूक घेण्याची त्यांची इच्छा नसली तरी त्यांना घ्यावी लागेल. निवडणूक आयोगाला उत्तर द्यावं लागेल. नोव्हेंबरमध्ये त्यांना विधानसभा अस्तित्वात आणावी लागेल.’
पुढे राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेला विषय लाडकी बहीण योजनेवर टोला लगावत संजय राऊत म्हणाले, “अजित पवार हे स्वतः बारामतीत पराभूत होतील. त्यांच्या लाडक्या बहिणी त्यांना पराभूत करतील. महाराष्ट्रातील सर्व गद्दार आमदार पुन्हा विधानसभेत दिसणार नाहीत. राज्यातील लाडक्या बहिणी त्यांचा पराभव करतील. आमदारांना ५० कोटी, खासदारांना १०० कोटी तर नगरसेवकांची किंमत ५ कोटी आणि आमच्या लाडक्या बहिणींसाठी १५०० रुपये देता का? मते दिली नाहीत तर पैसे परत घेण्याची भाषा करतात”