Amarnath Yatra : जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पहलगाम आणि बालटाल या दोन्ही मार्गावरील अमरनाथ यात्रा मंगळवारी थांबवण्यात आली. प्रशासनाने लवकरच प्रवास पुन्हा सुरू होईल, अशी आशा व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रस्त्याच्या दुरुस्तीचे काम चालू असल्याने ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. पावसामुळे अमरनाथ यात्रेच्या बालटाल मार्गावर तातडीने काम करण्याची गरज असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
काश्मीरचे विभागीय आयुक्त विजय कुमार बिधूड़ी म्हणाले की, मुसळधार पावसामुळे श्री अमरनाथ जी यात्रा मार्गाच्या बालटाल मार्गावर तातडीने दुरुस्ती आणि देखभालीचे काम करण्याची गरज आहे. तसेच पुढील माहिती वेळेवर जाहीर केली जाईल असेही सांगितले आहे.
“यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी बालटाल मार्गाने प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. यासोबतच अमरनाथ यात्रेशी संबंधित अधिक माहितीही वेळेवर जाहीर केली जाईल.” अमरनाथ यात्रेच्या पहलगाम मार्गावर आवश्यक दुरुस्ती आणि देखभालीचे काम सुरु असून लवकरच यात्रा पुन्हा सुरु करणार आल्याचे सांगितले आहे.
१९ ऑगस्टला संपणार अमरनाथ यात्रा
यंदा अमरनाथ यात्रा २८ जूनपासून सुरू झाली आहे. यासोबतच आधीच जाहीर झालेल्या यात्रा कार्यक्रमानुसार अमरनाथ यात्रा ५२ दिवस चालणार आहे. श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी म्हणजे १९ ऑगस्टला यात्रेची सांगता होईल. अमरनाथ यात्रेसाठी बालटाल आणि पहलगाम हे दोन मुख्य मार्ग आहेत.