Ajit Pawar : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या आणि प्रचंड हाय प्रोफाईल म्हणून गणल्या गेलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांचा पराभव करत विजय मिळवला.बारामती मतदार संघातील नणंद-भावजय ही लढाई चांगलीच रंगली होती आणि चर्चेचा विषय देखील ठरली होती,अखेर या लढाईत सुप्रिया सुळेंनी बाजी मारली, यावरच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे.
लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवणे, ही एक मोठी चूक असल्याचे त्यांनी सांगितले. राजकारण हे पार घरामध्ये शिरुन द्यायचं नसतं. मागे मात्र माझ्याकडून थोडी चूक झाली. त्या काळामध्ये मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होते. त्यावेळेस केले गेलं, पार्लामेंटरी बोर्डाकडून निर्णय घेतला गेला. पण एकदा बाण सुटल्यावर आपण काही करु शकत नाही. पण आज माझे मन मला म्हणत आहे असे नको होते अशी कबुली अजित पवार यांनी यावेळी दिली आहे.
दरम्यान, रक्षाबंधनाच्या सणाला अवघे काही दिवस शिल्लक असतानाचं अजित पवार यांची ही कबुली चर्चेचा विषय ठरत आहे. अजित पवार रक्षाबंधनाच्या सणाला सुप्रिया सुळे यांना भेटायला जाणार का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.