कलकत्ता उच्च न्यायालयाने आज कोलकातामधील ९ ऑगस्ट रोजी झालेल्या महिला पोस्ट ग्रॅज्युएट ट्रेनी (पीजीटी) डॉक्टरवरील लैंगिक अत्याचार आणि हत्येचा सीबीआय तपास करण्याचे आदेश दिले.न्यायालयाने कोलकाता पोलिसांना सर्व कागदपत्रे तातडीने सीबीआयकडे सोपवण्यास सांगितले आहे.
एका आंदोलक डॉक्टरने या बातमीवर प्रतिक्रिया दिली, “आम्हाला खूप आनंद झाला आहे आणि हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले आहे. आरोपींना आता लवकरच अटक केली जाईल…”
महिला डॉक्टरांच्या लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या विरोधात एकत्र येत फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन (एफएआयएमए) ने देशव्यापी ओपीडी सेवा बंद ठेवत डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आज एम्स दिल्ली येथे आंदोलन सुरु केले होते. .
कलकत्ता उच्च न्यायालयाने आरजी कार मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना रजेचा अर्ज सादर करण्यास सांगितले.आहे.
संदिप घोष यांनी सोमवारी आरजी कार मेडिकल कॉलेजच्या प्राचार्यपदाचा राजीनामा दिला आणि हॉस्पिटलच्या आवारात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कारानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली बदनामी होत असल्याचा आरोप केला होता. मात्र त्यानंतर लगेचच घोष यांची कोलकाता येथील कोलकाता नॅशनल मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली होती.
कलकत्ता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाने मंगळवारी या प्रकरणातील अनेक जनहित याचिकांवर विचार केल्याचे सांगितले आहे. सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी माजी प्राचार्यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणाऱ्या प्राचार्याची दुसऱ्या सरकारी महाविद्यालयात प्राचार्यपदी नियुक्ती कशी केली जाऊ शकते? कोर्टाने त्यांना 3 पर्यंत रजेचा अर्ज सादर करण्यास सांगितले आहे. आज दुपारी किंवा न्यायालय त्यांना पद सोडण्याचा आदेश देईल,” असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
9 ऑगस्ट रोजी कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये एक पोस्ट ग्रॅज्युएट प्रशिक्षणार्थी डॉक्टर मृतावस्थेत आढळून आली. तपासात बलात्कार आणि हत्या झाल्याचे समोर आले आहे. वृत्तानुसार, मृताच्या शरीरावर स्क्रॅचच्या खुणा आहेत, जे घटनेच्या वेळी झटापट झाल्याचे दर्शविते. पीडितेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी मंगळवारी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) पश्चिम बंगाल सरकारकडे या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी आणि दोषींना शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
IMA ने आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून गुन्हा घडवून आणणाऱ्या परिस्थितीची तपशिलवार चौकशी करण्याची तसेच कामाच्या ठिकाणी डॉक्टरांची विशेषतः महिलांची सुरक्षा सुधारण्यासाठी पावले उचलण्याची मागणी केली आहे.