Iran Attack On Israel : इराण या आठवड्यात इस्रायलवर हल्ला करू शकतो, अशा परिस्थितीत आपल्याला तयार राहावे लागेल असे व्यक्तव्य अमेरिकेने केले आहे. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन किर्बी यांनी ही माहिती दिली आहे.
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अलीकडेच ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटलीच्या नेत्यांशी पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि संपूर्ण प्रदेशात पसरणाऱ्या संघर्षाच्या संभाव्य धोक्याबाबत चर्चा केली आहे. त्यानंतरच किर्बी यांचे हे वक्तव्य समोर आले आहे.
किर्बी म्हणाले की, आपल्याला हल्ल्यांसाठी तयार राहावे लागेल. तसेच अमेरिकेने असेही म्हटले आहे की, आपल्याला हिंसाचारात वाढ नको आहे आणि इराण आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांनी इस्रायलवर कोणतेही हल्ले करू नयेत. तसेच ओलीसांच्या सुटकेच्या प्रयत्नांना पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे.
इस्माईल हानिया यांच्या मृत्यूमुळे तणाव वाढला
इराणने तेहरानमध्ये हमासच्या नेत्याला लक्ष्य केल्याचा बदला घेण्याची घोषणा केली. नुकतेच इस्रायलने बेरूतमध्ये हिजबुल्लाच्या एका टॉप कमांडरलाही ठार केले होते. अशा स्थितीत हिजबुल्लाही इस्रायलवर हल्ला करण्याचा विचार करत आहे. हिजबुल्ला आणि इराण मिळून इस्रायलवर हल्ला करू शकतात, असे मानले जात आहे. त्यामुळेच पश्चिम आशियात तणाव शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेनेही इस्रायलला मदत करण्यासाठी आपल्या युद्धनौका आणि लढाऊ विमानांचा ताफा पश्चिम आशियामध्ये पाठवला आहे.
तर उत्तर इस्रायलमध्ये हिजबुल्लाहने मोठ्या हल्ल्यात 30 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. इस्त्रायली हवाई संरक्षण यंत्रणाही अनेक रॉकेट नष्ट करण्यात अपयशी ठरली. मात्र, आतापर्यंत या रॉकेट हल्ल्यात जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. लेबनॉन-आधारित हिजबुल्लाहने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य केल्याचा दावाही केला.