Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे अनेकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहिले आहेत. यावेळी त्यांनी थेट पोलिसांनाच धमकी दिली आहे. सांगलीतील पलूस येथे आयोजित शिवशक्ती-भिमशक्ती जनआक्रोश मोर्चावेळी त्यांनी “मस्ती कराल तर बायकोला फोनही लागणार नाही अशा जिल्ह्यात पाठवू,” असा इशारा पोलिसांना दिला आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
काय बोलले नितेश राणे?
लव्ह जिहाद वर बोलताना भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सांगलीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांना भर सभेतून दम भरला. ‘सरकार हिंदूचे आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात घेऊन बदली करू की तुमच्या बायकांना देखील फोन लागणार नाही. लव्ह जिहादमध्ये मुलगी गेलेल्या बापाची भावना समजून घ्या. अशापद्धतीचे अश्रू परत माझ्या इथल्या हिंदू मुलीच्या वडिलांच्या डोळ्यातून आले तर त्याच्यापेक्षा दुप्पट अश्रू मी तुमच्या डोळ्यातून काढण्याची गॅरंटी देतो’, अशा शब्दात नितेश राणे यांनी पोलिसांना खडसावून सांगितले. मी काही निवेदन वगैरे देत बसत नाही, ती भाषा मला जमत पण नाही. मी डायरेक्ट कार्यक्रम करतो. असा इशाराच भरसभेत नितेश राणे यांनी दिला आहे.
पुढे ते म्हणाले, “यापुढे अर्ध्या तासात गुन्हा दाखल झाला नाही, तर तीन तासांत नितेश राणे पोलिस ठाण्यात येऊन धिंगाणा घालेन. कुणालाही सोडणार नाही. धमकी देत बसणार नाही. आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आम्हाला मारलं जात आहे,” असं नितेश राणे यांनी सांगितलं.