भारत आणि पाकिस्तान फाळणीचे स्मरण करत आज भाजपा ‘फाळणी वेदना स्मृती दिन’ साजरा करत आहे. देशासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या लाखो भारतीयांच्या संघर्ष आणि बलिदानाचे स्मरण करत स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ‘विभाजन विभीषीका (फाळणीच्या वेदना ) स्मृती दिवस’ भाजपकडून पाळला जातो.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या अनेक नेत्यांनी फाळणीच्या वेळी झालेल्या अमानुष छळांचे स्मरण करत त्यावेळी शाहिद झालेल्यांना आदरांजली वाहिली आहे.
देशाच्या फाळणीमुळे आपले प्राण गमावलेल्या आणि विस्थापित झालेल्या सर्वांना श्रद्धांजली म्हणून, त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ 14 ऑगस्ट हा दिवस “फाळणी वेदना स्मृती दिन” म्हणून पाळण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.या दिवसाचे स्मरण भारतीयांच्या वर्तमानातील आणि भावी पिढ्यांना फाळणीच्या वेळी लोकांना सोसाव्या लागलेल्या वेदना आणि दुःखाची आठवण करून देईल” .अशी यामागची संकल्पना आहे.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ,भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजप नेत्यांनी या अत्यंत क्रूर काळात ज्यांनी अमानुष दुःख सहन केले, प्राण गमावले तसेच बेघर झाले अश्या लाखो लोकांना आदरांजली वाहिली आहे.
पीएम नरेंद्र मोदींनी त्यांच्या एक्स अकाउंटवर लिहिले आहे की, “फाळणी स्मृती दिनानिमित्त,आम्हाला त्या असंख्य लोकांची आठवण येते ज्यांना फाळणीच्या भीषणेमुळे त्रास झाला आणि बलिदान द्यावे लागले. त्यांच्या धैर्याला आदरांजली वाहण्याचा हा दिवस आहे, जो मानवी लवचिकतेची शक्ती दर्शवितो.फाळणीमुळे बाधित झालेल्या अनेकांनी आपले जीवन पुन्हा उभारले आणि प्रचंड यश मिळवले.आज, आम्ही आमच्या देशातील एकता आणि बंधुभाव यांचे आम्ही नेहमी रक्षण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो”.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, “आज ‘फाळणी आपत्ती स्मरण दिनानिमित्त मी इतिहासातील सर्वात क्रूर प्रसंगादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या लाखो लोकांना आदरांजली अर्पण करतो . यातल्या काहींनी अपार दुःख सहन केले. काहींनी आपले प्राण गमावले तर काही बेघर झाले. आपल्या इतिहासाचे स्मरण करून आणि त्यातून योग्य धडा घेऊन राष्ट्र आपले भक्कम भविष्य घडवू शकते आणि एक शक्ती म्हणून उदयास येऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांनी हा दिवस साजरा करण्याची सुरु झालेली ही परंपरा राष्ट्र उभारणीच्या दिशेने उचललेले एक मजबूत पाऊल आहे”.
तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आपल्या संदेशात म्हणतात की,”फाळणी आपत्ती स्मृती दिना’ निमित्त मी त्या सर्वांना आदरांजली अर्पण करतो जे देशाच्या फाळणीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत हिंसाचाराचे आणि द्वेषाचे बळी ठरले, त्यांच्या वेदना आज एवढ्या वर्षांनंतरही देशाला जाणवत आहेत. आणि त्या फाळणीची भीषणता आठवून आम्ही सर्वजण पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली नवीन, एकसंध आणि मजबूत भारत घडवण्याचे काम करत आहोत, जेणेकरून या देशाला पुन्हा अश्या कठीण काळातून जावे लागू नये”.