पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा हे पुणेकरांसह राज्यभरातील पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे.पुण्याची ओळख सांगताना शनिवार वाड्याची ओळख आवर्जून सांगितली जाते कारण शनिवार वाडा ही पुण्याची ऐतिहासिक ओळख आहे. मात्र आता शनिवार वाडा दत्तक दिला जाणार आहे. केंद्राकडून हा निर्णय घेण्यात आला असून शनिवार वाड्यासोबतच आणखी 4 ऐतिहासिक वास्तू दत्तक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान या निर्णयाला सुरुवातीपासूनच विरोध होताना दिसतो आहे .पुण्यातील ब्राह्मण महासंघाने या निर्णयावर जोरदार टीका केली आहे.तसेच पर्यटक आणि पुणेकरांनी या दत्तक योजनेला विरोध दर्शवला आहे.
ऐतिहासिक वारसा स्थळांसाठी केंद्रीय पुरातत्व खात्याने नवी योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत पुणे शहरासह जिल्ह्यातील एकूण पाच ऐतिहासिक वारसा स्थळ दत्तक दिली जाणार आहेत. पुरातत्व स्थळांचे संवर्धन व्हावे या उद्देशाने केंद्रीय पुरातत्व विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. या विभागाअंतर्गत अॅडॉप्ट अ हेरिटेज योजनेखाली सध्या संपूर्ण संस्थान दत्तक घेता येणार आहेत. या माध्यमातून ऐतिहासिक स्थळांच्या संवर्धन केले जाणार आहे.केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीखाली तब्बल ३ हजार ६९६ वारसा स्थळे आहेत. यात प्राचीन स्मारके, मंदिरे आणि काही धार्मिक स्थळे व ऐतिहासिक आहेत. वारसास्थळ दत्तक योजनेत सुरुवातीला देशातील ६६ वारसा स्थळे ही विविध संस्थांना दत्तक दिली जाणार आहेत.
शनिवारवाड्यासोबतच पुण्यातील आगाखान पॅलेस, पाताळेश्वर लेणी, लोहगड, कार्ला लेणी आणि भाजे लेणी ही वारसा स्थळे दत्तक घेता येणार आहेत. दरम्यान ब्राह्मण महासंघाने या निर्णयाला विरोध केला आहे. दत्तक घेतलं जातं त्याला कोणी पुढे मागे सांभाळणार नसतं अशी टीका ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केली आहे. तसेच त्यांनी या योजनेविरोधात थेट कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे केंद्र सरकारची ही दत्तक योजना पुण्यात वादात सापडलेली दिसून येत आहे.